( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ने दणदणीत यश मिळवत १७ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या या पॅनलने बहुमत मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले.
या निवडणुकीत यंदा उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र, राजापूरचे आमदार किरण सामंत, डॉ. चोरगे, तसेच माजी खासदार विनायक राऊत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उद्धवसेना पॅनलने नामनिर्देशन मागे घेतले. त्यामुळे सहकार पॅनलमधील १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. या बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणंजू, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, स्वतंत्र उमेदवार हरेश्वर कालेकर यांनी तीन जागांवर उमेदवारी दिल्याने, ५ जुलै रोजी उर्वरित तीन जागांसाठी मतदान घेण्यात आले. यात दोन जागांवर सहकार पॅनलचे नितीन कांबळे आणि सीताराम लांबोरे विजयी झाले, तर एका जागेवर कालेकर यांनी बाजी मारली.
‘चिठ्ठी’मुळे एक जागा गमावली
विशेष म्हणजे, एका जागेसाठी कालेकर आणि सहकार पॅनलचे मधुकर दळवी यांना समान मते मिळाली. यानंतर निकालासाठी चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. चिठ्ठीत कालेकर यांच्या बाजूने कौल गेल्याने सहकार पॅनलला एक जागा गमवावी लागली.