(लांजा /रत्नागिरी)
जंगलातून अचानक ४ ते ५ रानडुक्करे रस्त्यावर आडवी आल्याने दुचाकीचालकाने ब्रेक लावताच दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय चंद्रकांत नारायण गुरव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पावस-देवधे मार्गावरील उपळे फाटा येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा अपघात घडला. रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या गुरव यांची अखेर प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत नारायण गुरव (वय ५५, रा. गोविळ, गुरववाडी, ता. लांजा) हे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे भाचे अनिकेत गोपीनाथ गुरव (वय ३५, रा. गवाणे, गुरववाडी, ता. लांजा) यांच्या होंडा शाईन दुचाकीवर (क्रमांक MH 08 BG 9690) मागे बसून प्रवास करीत होते. पावस-सापुचेतळे मार्गे गवाणे येथे जात असताना रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पावस-देवधे रस्त्यावरील उपळे फाटा येथे जंगलातून अचानक ४ ते ५ रानडुक्करे रस्त्यावर आडवी धावत आली.
समोर अचानक रानडुकरांचा कळप आल्याने अनिकेत यांनी दुचाकीला ब्रेक लावला. मात्र, त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चंद्रकांत गुरव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५७ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराग बेडेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५९/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लांजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


