(गणपतीपुळे / वैभव पवार)
वेळेवर न येणारी एसटी बस, त्यामुळे अभ्यासाचे होणारे नुकसान आणि रोज नशिबी येणारी ६ ते ७ किलोमीटरची खडतर पायपीट… या सततच्या त्रासाला कंटाळून वेतोशी गावातील विद्यार्थ्यांनी अखेर पालक व ग्रामस्थांसह थेट माळनाका येथील एसटी विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला.
वेतोशी हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ६ ते ७ किलोमीटर अंतर पायी पार करावे लागते. अशा परिस्थितीत एसटी बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, वेतोशीचे सरपंच अरुण झोरे आणि माजी सभापती साधना साळवी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी एसटी विभाग नियंत्रक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अधिकाऱ्यांसमोर मांडल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा
यावेळी ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी एसटी अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. “दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज एवढी पायपीट का करावी लागते? वेळेवर बस सेवा का मिळत नाही?” असा जाब प्रशासनाला विचारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वेळेवर बससेवेचे प्रशासनाकडून आश्वासन
ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता एसटी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. यापुढे बससेवेत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, वेतोशी गावासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल तसेच विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व नियमित होण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे तोंडी आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

