(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
दुचाकी सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे गेलेल्या २८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अचानक फिट आल्याने तो रस्त्याच्या कडेला डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत आढळून आला. उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. केतन संजय मोहिते (वय २८, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन मोहिते हे मागील तीन वर्षांपासून फिट या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. ९ नोव्हेंबर रोजी ते स्वतःची दुचाकी सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे घेऊन गेले होते. यावेळी देवरुख ते तुळसणी मार्गावरील आंबव येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक फिट आली. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत पडलेले आढळले.
यावेळी बाळकृष्ण कांबळे यांनी त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, देवरुख येथे दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४८/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.


