(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून उभारल्या जाणाऱ्या मिऱ्या–नागपूर महामार्गावर रत्नागिरी शहराजवळील चर्मालय येथील चार रस्त्यांचा परिसर म्हणजे ठेकेदाराचा बेजबाबदारपणा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अक्षम्य दुर्लक्षाचे जिवंत स्मारक बनला आहे. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ या ठिकाणी एका बाजूला उंच रस्ता, तर दुसऱ्या बाजूला खोलगट खड्डा अशी जीवघेणी अवस्था निर्माण करून ठेवण्यात आली आहे. महामार्गाचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे गेले असताना, चर्मालय सर्कलचे काम मात्र ठेकेदाराच्या मनमानी आणि संथ कारभारामुळे रखडले आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या या ठेकेदाराला जाब विचारण्याऐवजी महामार्ग प्राधिकरणाने ‘गांधारी’ची भूमिका घेतल्याने संतापाचा भडका उडाला आहे.
या परिसरात दोन्ही बाजूंच्या मार्गिका तयार झाल्या असल्या, तरी सर्कलचे काम अर्धवट स्थितीत ठेकेदार रवी इन्फ्राबिल्डने ठेवले आहे. परिणामी, अवजड वाहने, चारचाकी आणि दुचाकीस्वारांना उंच-सखल रस्त्यावरून अक्षरशः जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करताना चालकांची तारांबळ उडत असून, समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने येथे केव्हाही भीषण अपघात घडण्याची टांगती तलवार कायम आहे. चर्मालय सर्कल हा चार रस्त्यांचा अत्यंत वर्दळीचा केंद्रबिंदू आहे. मात्र, ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथे दररोज वाहतूक कोंडीचा विळखा पडत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ठेकेदाराने केलेला हा चिखल आणि गोंधळ निस्तारण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे. महामार्गावरील ही कोंडी फोडण्यासाठी एकाच वेळी चार-चार वाहतूक पोलिसांना भर उन्हात आणि धुळीत रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करावी लागत आहे. ठेकेदार आणि प्राधिकरणाच्या नाकर्तेपणाची शिक्षा वाहतूक पोलीस आणि सर्वसामान्य प्रवासी का भोगत आहेत, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
महामार्गाचे काम सुरू असताना प्रवाशांची सुरक्षितता जपणे ही ठेकेदार आणि प्राधिकरणाची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, चार महिन्यांपासून चर्मालय येथे मृत्यूचा सापळा रचला गेला असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी नेमके कोणते झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महामार्ग विकासाच्या नावाखाली प्रवाशांना महिनोनमहिने धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करण्यास भाग पाडणे कितपत योग्य आहे? एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाने आता कागदी घोडे नाचवणे बंद करून प्रत्यक्ष घटनास्थळी यावे आणि ठेकेदाराचे कान टोचून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी आता वाहनचालकांमधून केली जात आहे.


