(दापोली / रत्नागिरी)
तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीतील कारभारावरून आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले असून, सरपंचांविरोधातील तक्रारींमुळे स्थानिक पातळीवर वातावरण तापले आहे. विविध गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच रऊफ काझी यांनी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा मार्ग अवलंबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
उपसरपंच काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंचांवर आर्थिक अफरातफरीचे आरोप असून, त्याअनुषंगाने शासनाने त्यांना अपात्र ठरवले आहे. मात्र, नव्या धोरणानुसार त्याच सरपंचांना पुन्हा प्रभारी म्हणून सहा महिन्यांची संधी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात काझी यांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक अनियमितता, अधिकारांचा गैरवापर तसेच निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही काझी यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावण्या पार पडल्या असल्या, तरी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस कारवाई न झाल्याने उपसरपंचांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

