(चिपळूण / वार्ताहर)
कीटकनाशक औषध प्राशन केल्याने विषबाधा झालेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबीटगाव, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४.५३ वाजता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पवार यांना दारूचे व्यसन होते. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन आबीटगाव येथील घरी आले होते. यावेळी त्यांना उलटी झाली असता त्यातून उग्र वास येत असल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पत्नीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उपचार सुरू असताना कीटकनाशक औषध प्राशन केल्यामुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.५३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची खबर मृत व्यक्तीची मुलगी प्रियांका राजेश जाधव यांनी दिली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


