(मुंबई / वृत्तसंस्था)
अवघ्या २० दिवसांच्या नवजात बालकाची पैशांसाठी खरेदी-विक्री केल्याचा गंभीर प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. सुरुवातीला अडीच लाख रुपयांत ठरलेला बाळाचा सौदा पुढे वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. मुंब्रा येथून सुरू झालेला या नवजात बाळाचा प्रवास जालना मार्गे रत्नागिरीपर्यंत झाला. या प्रकरणाचा तपास करताना मुंब्रा पोलिसांनी रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका केली असून, या कथित विक्री व्यवहारात सहभागी असलेल्या दहा जणांना अटक केली आहे. आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार अनिसा रफीक शेख ही कळवा येथील शांतीनगर परिसरात राहते. ती मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते. तिच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी रेहान रिजवान शेख याने दबाव आणल्याचा आरोप आहे. या व्यवहारापोटी अनिसाला एक लाख ९५ हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, बाळाच्या विक्रीचा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच व्यवहारातून मिळालेली रक्कमही हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनिसा आणि तिच्या बहिणीला वायरने मारहाण करून पैसे काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अनिसाने ५ नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपासासाठी पाच स्वतंत्र पथके नियुक्त केली. या पथकांनी मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि जालना या ठिकाणी शोधमोहीम राबवली. बाळाला कोणाकडे ठेवण्यात आले आहे, याचा माग काढण्यासाठी संशयितांच्या हालचालींची माहिती संकलित करण्यात आली.
तपासात नवजात बाळाला मुंब्रा येथून कल्याण आणि दिवा येथे नेण्यात आले आणि त्यानंतर थेट रत्नागिरीपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रत्नागिरीत कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले. त्याची सुखरूप सुटका झाल्यानंतर या व्यवहारामागील साखळीही तपासातून उघड झाली. सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरलेला बाळाचा सौदा पुढे वेगवेगळ्या व्यक्तींकडून होत साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून, अन्य दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या दहा आरोपींना न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, बाळाच्या विक्रीत पैशांची देवाणघेवाण नेमकी कशा प्रकारे झाली आणि अशाच पद्धतीने अन्य बालकांचीही विक्री करण्यात आली आहे का, या दिशेने मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत.


