(अयोध्या / वृत्तसंस्था)
प्रभू श्रीरामांच्या नगरीत 10 व्या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सलग दहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने अयोध्येला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले. सूर्यास्ताच्या वेळी सरयू नदीच्या तीरावरील 56 घाटांवर 30 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. या सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या मान्यवरांनी ‘राम की पैडी’ येथे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवात सहभाग घेतला.
दीपोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील मंदिरांपासून ते मुख्य रस्ते, अरुंद गल्ल्या, सरकारी कार्यालये आणि धार्मिक इमारतींपर्यंत सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिव्यांची सजावट करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीही आपापल्या घरांमध्ये दिवे लावून या उत्सवात सहभाग नोंदवला. घरे, मठ, मंदिरे, आश्रम, सार्वजनिक चौक आणि सरकारी इमारती दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अयोध्येतील स्थानिक नागरिकांसह देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक आणि परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
दीपोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचा प्रारंभ विधिवत पूजाअर्चेने झाला. अयोध्येतील रामकथा पार्क येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमानजी आणि विविध ऋषीमुनींची आरती केली. यावेळी सर्वांना टिळक लावून पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्यमंत्री, साधू-संत आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांचा प्रतीकात्मक राज्याभिषेकही पार पडला.
या सोहळ्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे ‘पुष्पक विमाना’तून आगमन होत असल्याचे दृश्य सादर करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून कलाकारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी यावेळी रथ ओढला. या प्रसंगाने उपस्थित भाविक भारावून गेले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेचा व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमस्थळाची विभागणी 20 झोन आणि 53 क्षेत्रांमध्ये करण्यात आली होती. सुरक्षेची जबाबदारी 20 अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Addl. SP) आणि 45 सर्कल ऑफिसर (CO) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्या मदतीसाठी सुमारे 6000 पोलीस कर्मचारी तैनात होते. याशिवाय प्रांतीय सशस्त्र दलाच्या (PAC) नऊ कंपन्या आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) तीन कंपन्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाची (ATS) दोन कमांडो पथकेही सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आली होती. सरयू नदीतील सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) पथके तैनात करण्यात आली होती. तसेच नदीकिनारी पीएसीची (PAC) पूर-सहायता कंपनीही तैनात करण्यात आली होती.


