(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘पावसाळी कला प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर गोविंदराव निकम राहणार आहेत. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इसाक महंमद खतीब, उपाध्यक्ष युगंधरा प्रकाश राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत गोविंदराव निकम, कार्याध्यक्ष अनिकेत शेखर निकम, सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक तसेच सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध कलाप्रकारांमधील त्यांची प्रतिभा रसिकांसमोर आणणे, हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून, कला रसिकांना विद्यार्थ्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची आणि सर्जनशीलतेची अनुभूती घेता येणार आहे.
या प्रदर्शनाचे नियोजन सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रभारी प्राचार्य प्रा. माणिक शिवाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. कृतिका खामकर, सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून कु. चिन्मय वडपकर आणि जनरल सेक्रेटरी म्हणून कु. सिद्धार्थ भोसले यांच्यासह विद्यार्थी आयोजनात सहभागी झाले आहेत.
‘पावसाळी कला प्रदर्शन २०२६’ हे ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सह्याद्री कलादालन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या कालावधीत विविध कलाकृती पाहण्याची आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला दाद देण्याची संधी कला रसिकांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलाकृतींना व्यापक स्तरावर रसिकांची दाद मिळावी, यासाठी कला क्षेत्रातील जाणकार, पालक, विद्यार्थी तसेच कला रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के आणि प्रभारी प्राचार्य प्रा. माणिक यादव यांनी केले आहे.

