(गणपतीपुळे / वैभव पवार)
मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देणारे आणि आपल्या क्रांतिकारी विचारांनी साहित्यविश्वात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करणारे आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मालगुंड येथे त्यांना साहित्यिक अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या साहित्यिक कार्याचे आणि परिवर्तनवादी विचारांचे स्मरण करण्यात आले. कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंडमधील स्मारक परिसर यावेळी साहित्यिक आणि काव्यमय वातावरणाने भारून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्मारकातील कवी केशवसुत यांच्या अर्धाकृती पुतळ्याला स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली. त्यानंतर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी साहित्यिक कार्यक्रम पार पडला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखाध्यक्षा नलिनीताई खेर यांच्या हस्ते कवी केशवसुतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
यावेळी आबा पाटील आणि नलिनीताई खेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केशवसुतांच्या साहित्यिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा. हनमंत कदम यांनी त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेत केशवसुतांच्या कवितेतील आधुनिक दृष्टिकोन, परिवर्तनाची आस आणि सामाजिक जाणिवांचे महत्त्व अधोरेखित केले. शुभदा मुळ्ये यांनी केशवसुतांची ‘स्फूर्ती’ ही कविता सादर करून त्यांना काव्यरूपाने आदरांजली वाहिली.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे दक्षिण कोकण विभाग युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनीही आपल्या स्वरचित कवितांमधून केशवसुतांच्या विचारांचा जागर केला. त्यांनी कवी केशवसुतांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कवी केशवसुतांची कविता’ आणि ‘शब्दक्रांतीचा सूर्य केशवसुत’ या दोन स्वरचित व संगीतबद्ध कविता सादर केल्या. त्यांच्या या सादरीकरणातून केशवसुतांच्या विचारक्रांतीचे आणि मराठी कवितेला मिळालेल्या आधुनिक अभिव्यक्तीचे दर्शन घडले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्यिक चळवळीचा जयजयकार करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दिवाळीच्या उत्सवी वातावरणात पार पडलेल्या या साहित्यिक सोहळ्याला स्नेहमेळाव्याचीही जोड मिळाली. शुभदा मुळ्ये यांनी आणलेले लाडू व चकल्या, तर उज्ज्वला बापट यांनी आणलेल्या गोड शिऱ्याचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. यावेळी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच साहित्यिक विषयांवरही विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे या कार्यक्रमाला साहित्यिक जिव्हाळ्याबरोबरच स्नेहपूर्ण वातावरणाचीही जोड मिळाली.
या कार्यक्रमाला स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील, कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनीताई खेर, दक्षिण कोकण विभाग युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, मालगुंड कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, रामानंद लिमये, प्रा. हनमंत कदम, उज्ज्वला बापट, डॉ. मोरेश्वर मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्मारकाचे कर्मचारी स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे आणि साहित्यप्रेमींनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कवी केशवसुत यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या कवितांमधून व्यक्त झालेला परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि मराठी साहित्याची ज्योत अधिक तेजस्वी करण्याचा संकल्प या साहित्यिक कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.


