(संगमेश्वर /एजाज पटेल)
आज (गुरुवारी) संध्याकाळनंतर संगमेश्वर शहरात पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झाली. दररोज नित्याची बनलेली ही समस्या आज मात्र कमालीची गंभीर ठरली. संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी अवघ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर टाकण्यात आल्याचे चित्र दिसून आले. वाहतुकीच्या प्रचंड ताणात त्या महिला कर्मचाऱ्याला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दृश्य अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले.
मुख्य चौक व आसपासच्या रस्त्यांवर चार ते पाच की.मी.पर्यंत तीनही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी यांची गर्दी वाढतच चालली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली वाहतूक कोंडी एका पोलीस कर्मचाऱ्याने सुरळीत करणे अशक्य असतानाही प्रशासनाकडून कोणतीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
वाहतूक कोंडीतून वाट काढताना दोन चारचाकी वाहनांतील चालकामध्ये तीव्र वाद झाला. हा वाद इतका वाढला की मारहाणीपर्यंत परिस्थिती जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र घटनास्थळी अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने स्थानिक नागरिकांनाच मध्यस्थी करून वाद शांत करावा लागला. हा प्रकार पुढे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.
संगमेश्वर येथे दररोजची वाढती वाहतूक आणि सतत होणारी कोंडी लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी व वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. वृत्तपत्रे व सोशल माध्यमातून वाहतूक कोंडीची छायाचित्रांसह बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने “प्रशासनाचा कारभार ढिसाळ झाला आहे की काय?” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
गुरुवारी अखेर स्थानिक नागरिक कैस मालगुंडकर यांनी स्वतः पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळाले. मात्र हा तात्पुरता उपाय असून कायमस्वरूपी नियोजन व मनुष्यबळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून एखादी गंभीर घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. संगमेश्वरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाढती वाहतूक लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त पोलीस तैनाती, योग्य वाहतूक नियोजन आणि कडक अंमलबजावणी करण्याची गरज आता अधिकच तीव्र झाली आहे.

