(संगमेश्वर / एजाज पटेल)
तेली समाज सेवा संघ संगमेश्वर तालुका यांच्या वतीने आज (शुक्रवार, दिनांक 24) रोजी देवरुख तहसीलदार यांना निवेदन सादर करुन तेली आणि ओबीसी समाज यांच्या हक्कावर गदा आणणारा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. देवरुखचे प्रभारी तहसीलदार श्री सुदेश गोताड यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी तेली समाज सेवा संघ संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री संतोष रहाटे, सचिव श्री योगेश चव्हाण, महिला अध्यक्ष श्रीमती दीपिका किर्वे, उपाद्यक्ष पांडुरंग रहाटे, प्रांतिक महिला अध्यक्ष सौ. प्रिया भोपळकर, मधुरा भोपळकर, श्री संतोष किर्वे, श्री जनार्दन रहाटे, राजेश झगडे यांच्यासह तेली समाज सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष खासदार श्री रामदास तडस यांच्या मार्गदर्शनानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे निवेदने सादर करण्यात आली. तेली अर्थात ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्यामुळे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटीयर आधारीत मराठा-कुणबी आरक्षणाकरिता असलेला काळा जीआर रद्द करणे तथा न्या.शिंदे समिती, मराठा व ओबीसी उपसमिती बरखास्त करणे अशी मागणी निवेदन सुपूर्द करून केली आहे.

