(चिपळूण /प्रतिनिधी)
दम्याचा आणि फुफ्फुसाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हनुमान भोयर (रा. खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांना दम्याचा त्रास होता. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. २४ जून रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने चिपळूण येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच दिवशी सकाळी सुमारे ११.२० वाजता त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पोलीस करीत आहेत.

