(गणपतीपुळे / वैभव पवार)
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या गणपतीपुळे येथे पर्यटन हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लहान-मोठ्या पर्यटन व्यावसायिकांनी कंबर कसली असून, संपूर्ण परिसरात स्वागताची लगबग सुरू झाली आहे.
दिवाळीच्या कालावधीत शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबे पर्यटनासाठी बाहेर पडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत गणपतीपुळे येथे पर्यटकांची विशेष पसंती असल्याने दरवर्षी या काळात मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यटन व्यावसायिकांकडून आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली जात आहे.
पर्यटकांच्या निवासासाठी महत्त्वाच्या असलेल्या हॉटेल्स आणि लॉजिंगमध्ये रंगरंगोटी व आकर्षक सजावटीची कामे करण्यात आली आहेत. पर्यटकांना दर्जेदार सुविधा देता याव्यात, यासाठी व्यावसायिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यंदाच्या दिवाळी हंगामासाठी पर्यटकांनी आगाऊ आरक्षण करण्यास सुरुवात केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
खासगी हॉटेल्स आणि लॉजिंगप्रमाणेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटन निवासालाही दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देश-विदेशातील पर्यटकांकडून मोठी पसंती मिळते. यंदाच्या हंगामासाठी येथेही पर्यटकांच्या निवास आरक्षणाला सुरुवात झाल्याचे एमटीडीसी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
गणपतीपुळे पर्यटनाबरोबरच स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठीही प्रसिद्ध असल्याने या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकही पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. उंट, घोडे, एटीव्ही बाईक, फोटोग्राफी, सरबत विक्री, शहाळी विक्री यांसह अन्य छोट्या व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय सज्ज ठेवण्याची तयारी केली आहे. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच या सर्व स्तरांवर तयारीला वेग आला असून, अवघ्या काही दिवसांवर आलेला पर्यटन हंगाम पर्यटकांच्या गर्दीने गजबजणार आहे.


