(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षेला रत्नागिरी शहरात मध्यम प्रतिसाद मिळाला. शहरातील पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल या दोन केंद्रांवर झालेल्या परीक्षेत एकूण ५८ टक्क्यांहून अधिक उमेदवार उपस्थित राहिले, तर तब्बल २२९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.
नीट आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षेसाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. परीक्षार्थ्यांची सखोल तपासणी केल्यानंतरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. पहिल्या सत्रातील पेपर क्रमांक १ साठी पटवर्धन हायस्कूल केंद्रावर २४० उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी १३० उमेदवार उपस्थित राहिले, तर १०९ जण अनुपस्थित होते. फाटक हायस्कूल केंद्रावर ३१४ उमेदवारांपैकी १९४ जणांनी परीक्षा दिली, तर १२० उमेदवार गैरहजर राहिले. दोन्ही केंद्रांवरील एकूण ५५४ उमेदवारांपैकी ३२५ जणांनी परीक्षा दिली. त्यामुळे उपस्थितीचा टक्का ५८.६६ इतका नोंदविण्यात आला.
द्वितीय सत्रात घेण्यात आलेल्या पेपर क्रमांक २ साठीही जवळपास अशीच उपस्थिती दिसून आली. पटवर्धन हायस्कूल केंद्रावर १३० उमेदवार उपस्थित राहिले, तर ११० अनुपस्थित होते. फाटक हायस्कूल केंद्रावर १९२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १२२ जण गैरहजर राहिले. एकूण ५५४ उमेदवारांपैकी ३२२ जणांनी परीक्षेला हजेरी लावली असून उपस्थितीचे प्रमाण ५८.१२ टक्के इतके राहिले. स्पर्धा परीक्षांकडे वाढता कल असतानाही जवळपास ४० टक्के उमेदवार अनुपस्थित राहिल्याने यंदाही परीक्षेतील गैरहजेरीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून परीक्षा शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

