( दापोली )
आंजर्ले ते दापोली मार्गावर सालदुरे एसटी थांब्याजवळ रविवार (३० नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील सोंडेघर येथील चिपळूणकर कुटुंबीय प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. गाडीमध्ये अमरीन चिपळूणकर, कादिर चिपळूणकर, मरियम चिपळूणकर, जारीना चिपळूणकर, सुमय्या चिपळूणकर आणि फौजिया चिपळूणकर असे एकाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते.
अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यावर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मिरज येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.

