(दापोली)
दापोली तालुक्यातील मुरुड येथे पुण्याहून आलेल्या पर्यटकांच्या मिनी बसचा रविवारी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. MH 12 VF 9390 क्रमांकाची मिनी बस रस्त्यावर पलटी होऊन समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना धडकली. या अपघातात तीन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातात मिनी बसचा चालक जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सलग तीन दिवसांची सुट्टी असल्याने मुरुड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. अपघातानंतर मुरुड मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

