(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील पानवल-शिंदेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता प्रभूंची पूजा, पूजेनंतर सकाळी १० वाजता ह.भ.प. श्रीनिवास पेंडसे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव, आरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. दुपारी ३ ते ४ वाजता हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडणार असून, सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता विराट विश्वकर्मा नाट्यनमन मंडळ, शिवराज कलामंच रत्नागिरी यांचे बहुरंगी नमन सादर होणार आहे.
शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पूजा, १० वाजता अभिषेक, दुपारी २ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित आहे. रात्री ८ वाजता लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, रत्नागिरी यांचा भजन कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८ ते ९.३० दरम्यान महाप्रसाद व रात्री १०.३० वाजता श्री रामकला मंडळाचे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे.
सदर उत्सव श्री राम कला मंडळ, पानवळ-शिंदेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक, श्री राम कला मंडळ यांनी केले आहे.

