(रत्नागिरी /संगमेश्वर प्रतिनिधी)
तालुक्यातील पांगरी परिसरात बेकायदेशीर दगड उत्खननामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विनापरवाना सुरुंग लावून डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या स्फोटांच्या हादऱ्यांमुळे घरांना तडे गेलेल्या ग्रामस्थांनाच घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पांगरी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शक्तिशाली भूसुरुंगांच्या स्फोटांमुळे परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून, दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या बेकायदेशीर उत्खननाविरोधात पांगरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर करून २५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. उत्खननामुळे घरे धोक्यात आली आहेत, नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत आणि धूळप्रदूषण वाढले आहे, असे नमूद करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
१२ जून रोजी तलाठी कार्यालयाकडून परिसरातील सात कुटुंबांना दरडप्रवण क्षेत्रात वास्तव्य करत असल्याचे कारण देत घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. भविष्यात जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कुटुंबांवरच राहील आणि नुकसानभरपाईही मिळणार नाही, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “दरड कोसळण्याचा धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने पीडितांनाच घराबाहेर काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मूळ प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
स्थानिकांच्या मते, डोंगर पोखरणाऱ्या आणि परिसराचे पर्यावरणीय संतुलन बिघडविणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून उत्खनन तात्काळ बंद करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने मूळ कारणावर कारवाई न करता परिणाम भोगणाऱ्या नागरिकांनाच लक्ष्य केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आमची पिढ्यान्पिढ्यांची घरे सोडून आम्ही कुठे जायचे? बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांना कोणाचे संरक्षण आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
राज्य मार्गालाही धोका
स्थानिकांच्या मते, सुरुंगांच्या स्फोटांमुळे केवळ घरेच नव्हे तर परिसरातील राज्य मार्गालाही संभाव्य धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे “कायद्याचा धाक सामान्य नागरिकांसाठी आणि मोकळीक माफियांसाठी?” अशी चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे.

