(रत्नागिरी / वार्ताहर)
शिरगाव येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, रत्नागिरीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन तेथील शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासह कोकणात अधिकाधिक मत्स्य उद्योजक निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच उपलब्ध सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.
महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायात रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या व्यवसायाचा शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील शिरगाव येथे सन २०११ मध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनची स्थापना करण्यात आली. मच्छिमारांच्या मागणीनुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत शास्त्रोक्त आणि शाश्वत मासेमारीसाठी व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
कोकणातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण न घेता थेट मत्स्य व्यवसायातील व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. कमी कालावधीत व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या अभ्यासक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
तंत्रनिकेतनमध्ये मुख्य शैक्षणिक इमारतीसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मासेमारीची जाळी, इंजिन, नौका, मत्स्य प्रक्रिया कार्यशाळा आणि मत्स्यबीज उत्पादन केंद्र यांच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. मंत्री उदय सामंत यांनी या सर्व पायाभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान त्यांनी मत्स्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर अधिकाधिक भर देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता मत्स्य व्यवसायाशी संबंधित व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे आणि कोकणात मत्स्य उद्योजकांची नवी पिढी तयार व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची, अभ्यासक्रमाची आणि उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती सादर केली. शिक्षक तौसीफ काझी, डॉ. सुशील कांबळे आणि मयुरी डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची माहिती दिली तसेच विविध प्रात्यक्षिकांचे स्वरूप स्पष्ट केले.
मंत्री उदय सामंत यांच्या या भेटीमुळे तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


