(रत्नागिरी /प्रतिनिधी)
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उन्हाची तीव्रता वाढली असून, त्याचा परिणाम कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या बागायतदारांना गेल्या चार-पाच दिवसांतील वातावरणातील बदलामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री जाणवणारा गारठा असे सध्याचे हवामान आंब्याच्या मोहोरासाठी पोषक ठरेल, अशी आशा बागायतदारांना आहे. मात्र, पुढील पंधरा दिवस थंडीचे सातत्य टिकते की पुन्हा उष्णतेचा पारा चढतो, यावर हापूसच्या मोहोराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील सुमारे १० ते ९५ टक्के आंब्याच्या झाडांना पालवी फुटली आहे; तर काही झाडांना अद्याप पालवी आलेली नाही. पालवी पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी साधारणतः ९० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्या झाडांना सध्या पालवी फुटली आहे, त्यांच्यावर जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान मोहोर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक थंडी टिकून राहणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, सध्याचे थंड वातावरण पुढील पंधरा दिवस कायम राहिल्यास काही झाडांना नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यानच मोहोर येण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. लवकर मोहोर येण्यासाठी संजीवकांचा वापर करूनही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा हवामानातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. मोहोर येण्यापासून फळधारणा आणि फळांच्या वाढीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट तापमान आणि संतुलित हवामानाची आवश्यकता असते. मोहोराच्या प्रक्रियेसाठी काही दिवस १४ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान पोषक मानले जाते; तर फळधारणेसाठी २४ ते ३० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल ठरते. या तापमानात किंचितही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम मोहोर, फळधारणा आणि पर्यायाने उत्पादनावर होऊ शकतो. एल निनोच्या प्रभावामुळे थंडीचे प्रमाण कमी राहून उष्णतेचे चक्र कायम राहिल्यास मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची किंवा अपेक्षित प्रमाणात मोहोर न येण्याची भीती व्यक्त होत आहे.
बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांपासून आंबा उत्पादनासमोर नवनवीन आव्हाने उभी राहत असल्याचे बागायतदार राजन कदम यांनी सांगितले. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असतानाही आंबा पिकाच्या उत्पादनवाढीसाठी हवामानातील बदलांचा अभ्यास करून अधिक प्रभावी संशोधन होणे आवश्यक आहे. कोणत्या हवामानात कोणती फवारणी करावी, कोणते कीटकनाशक वापरावे आणि त्याचे प्रमाण किती असावे, याबाबत बागायतदारांना वेळोवेळी शास्त्रीय मार्गदर्शन मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हवामानातील चढ-उतारांमुळे आंब्याच्या कोवळ्या पालवीवर तुडतुडे, मावा, फुलकिडे तसेच विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नव्याने फुटलेल्या पालवीचे संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना कीटकनाशकांच्या फवारणीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच औषधांचा वाढता खर्च आणि फवारणीच्या योग्य वेळेबाबतची अनिश्चितता यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. महागड्या फवारण्या करूनही मोहोर आणि पुढील फळधारणा सुरक्षित राहील याची खात्री नसल्याने शास्त्रीय उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.
केवळ कीटकनाशकांच्या वापराला परवानगी देऊन प्रश्न सुटणार नाही; तर बदलत्या हवामानात कीड-रोगांचे अचूक निदान, प्रभावी नियंत्रण आणि फवारणीचे योग्य वेळापत्रक याबाबत बागायतदारांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाने विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रत्यक्ष बागांमध्ये मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. यंदाच्या हापूस हंगामाचे गणित आता हवामानाच्या पुढील वाटचालीवर अवलंबून असून, थंडीचे सातत्य टिकणार की उष्णतेचा फटका बसणार, याकडे संपूर्ण आंबा बागायतदारांचे लक्ष लागले आहे.


