(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी या गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात रत्नागिरी जिल्ह्यातील निमंत्रित कवींचं ‘सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६’ संपन्न झाले. ग्रुप ग्रामपंचायत सत्कोडीचे विद्यमान सरपंच श्री सतीश थुळ व मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीत सादर केले. मराठी भाषा संवर्धनासाठी आपण सजगता दाखवली पाहिजे अशी आशा व्यक्त करत ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडीचे अध्यक्ष संजय बैकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल दि माॅडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांचा तर वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. श्रृती कदम यांचा सहदय सत्कार करण्यात आला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सतीश थुळ होते तर सूत्रसंचालन नितीन जाधव यांनी केले.
यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे सृजनोत्सव काव्यसंमेलन युवाकवी अरुण मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यात जेष्ठकवी राष्ट्रपाल सावंत यांनी ‘ज्ञानज्योती झालीस तू सावित्रीबाई’ , ‘सलामी’ व इतर कविता सादर केल्या, कवी लेखक व्याख्याते बुध्दघोष गमरे यांच्या दोन कविता, कवी नाटककार विनय होडे यांनी ‘माझ्या स्वप्नातील भारत’ व इतर कविता, अभिनेते, नाटककार कवी ज्ञानेश पाटील यांनी ‘हे आई’ व ‘शोध’ या रचना सादर केल्या. तसेच रत्नागिरी शाखा युवाशक्ती प्रमुख, पक्षीमित्र गायक कवी गुरूदेव नांदगावकर यांनी ‘माझं कोकण’, ‘माणूसकीचा प्रकाश’ व एक गझल सादर केली, अभिनेता कवी उमेश मोहिते यांनी ‘जीवन सुंदर आहे’, ‘माय मराठी माझी’ या कवितांचे सादरीकरण केले. युवा गझलकार , अभियंता शुभम कदम यानी एक गझल व ‘विरामचिन्हे’ ही कविता तर कवयित्री समृध्दी गोनबरे यांनी ‘स्वातंत्रगीत’ व ‘महाराष्ट्र गौरव गीत’ सादर केले.
किर्तनकार ह.भ.प. प्राध्यापिका कवयित्री अमृता नवाथे यांनी ‘पैसा’, ‘माय’ व नाट्यगीत सादर केले. युवा कवयित्री वृषाली कोवळे हिने ‘शाळा’ व ‘युवाशक्ती: नवभारताची कवचकुंडले’ ह्या कविता तर युवाकवी किरण टक्के याने ‘वाटसरू’ व ‘सांगा कसे जगावे’ ही गझल सादर केली. तसेच युवा कवयित्री प्रगती शिंदे हिने ‘मायबोली मराठी’ व ‘स्त्री शिक्षण नसते तर’ या कविता सादर केल्या. या सर्व कवींची मोट बांधता बांधता कवी अरुण मोर्ये यांनी ‘देवा मला कारे दिली बायको अशी’ , ‘चंद्रावरची शाळा’ व ‘पृथ्वी तरली तरली कष्टकऱ्यांच्या हातावर’ यांसारख्या कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. सर्व कवी कवयित्रीना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक व लेखनी देऊन गौरविण्यात आले. विविध विषयांवर भाष्य करत कवींच्या सादरीकरणाने व अरुण मोर्ये यांच्या खुमासदार निवेदनाने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्य संमेलनाचा समारोप ‘अभिजात मराठी’ या भैरवीने व सरपंच सतीश थुळ यांच्या अभ्यासपूर्ण मनोगताने झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवाशक्तीचे पदाधिकारी कमलाकर थुळ, संजय बंडबे, अथर्व जाधव, संगिता मोर्ये, अमर सागवेकर, विश्वनाथ बैकर यांनी परिश्रम घेतले.

