(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील जे के फाईल स्टॉपपासून जाणाऱ्या बायपास रस्त्याची पावसाच्या सरींनी अक्षरशः चिखलवाट झाली आहे. पाऊस येऊन गेल्यानंतर या मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून मोठमोठी डबकी तयार होत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याची ही दुरवस्था डोळ्यांसमोर असतानाही संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) यंत्रणेचे मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
चिरायू हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या बायपास मार्गावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक निचरा व्यवस्था प्रभावी नसल्याने पावसाची सर आली की रस्त्याचा काही भाग चिखलाने माखतो आणि ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचते. परिणामी पादचाऱ्यांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागत असून, वाहनांची ये-जा होताना रस्त्यावरील चिखलाचे पाणी अंगावर उडण्याचे प्रकारही घडत आहेत. या मार्गाच्या कामाशी संबंधित रवी इन्फ्रा बिल्ड या ठेकेदार कंपनीकडून आवश्यक उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. रस्त्यावरील पाणी आणि चिखलाचा प्रश्न वारंवार निर्माण होत असताना त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी परिस्थिती जैसे थे ठेवली जात असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या NHAI विभागानेही या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपयांची कामे होत असताना मूलभूत पाणी निचऱ्याची व्यवस्था नीट नसेल, तर अशा कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास संपेपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या सगळ्यावर कडी म्हणजे याच परिसरात मोकाट गुरांचा वावरही वाढला आहे. उनाड गुरे घोळक्याने भररस्त्यात ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांसमोर दुहेरी संकट उभे राहत आहे.
बायपासने गेल्यास चिखल आणि पाण्याची डबकी, तर महामार्गावरून गेल्यास रस्त्याच्या मधोमध बसलेली गुरे अशा परिस्थितीत वाहन चालवायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येण्याची शक्यता असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे केवळ बायपास रस्त्याची डागडुजी किंवा चिखल हटविणे पुरेसे नसून, मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याचीही गरज आहे.

