(पुणे / वृत्तसंस्था)
हृदयरोग उपचार क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणारे आणि पुण्यातील पहिली अँजिओप्लास्टी करण्याचा मान मिळवणारे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून आजारी असलेले डॉ. हिरेमठ घरीच विश्रांती घेत होते. मेंदूतील गंभीर आजाराशी त्यांची दीर्घकाळ झुंज सुरू होती. त्यांच्या निधनामुळे पुण्यासह देशातील वैद्यकीय आणि हृदयरोग उपचार क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. हिरेमठ यांनी आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय कारकिर्दीत हृदयरोग उपचार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. विशेषतः गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी प्रक्रियांमधील त्यांचे कौशल्य उल्लेखनीय होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांपेक्षा अधिक अँजिओग्राफी यशस्वीरीत्या केल्या. पुण्यात १९८९ मध्ये पहिली अँजिओप्लास्टी करण्याचा मानही त्यांना मिळाला होता. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवरील उपचार, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि हृदयरोगांचे लवकर निदान या क्षेत्रांतही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.
रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. तसेच ‘कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पुण्यातील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या उपचारांमुळे आणि मार्गदर्शनामुळे देश-विदेशातील असंख्य हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा मिळाला.
डॉ. हिरेमठ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी आणि कार्डिऑलॉजीमधील डीएम या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९८२ मध्ये पुण्यातील जोशी हॉस्पिटलमधून त्यांनी हृदयरोग उपचार क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे रुबी हॉल क्लिनिकसह पुण्यातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये त्यांनी सेवा बजावली. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशीही झुंज देत होते. वैद्यकीय कौशल्याबरोबरच रुग्णांप्रती असलेली आपुलकी आणि सेवाभाव यामुळे त्यांनी रुग्ण, सहकारी आणि वैद्यकीय क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाबद्दल रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. डॉ. शिरीष हिरेमठ यांनी रुबी हॉल क्लिनिकला हृदयरोग उपचार क्षेत्रात जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अनेक दशकांपासून त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ते कायम स्मरणात राहील, अशा भावना डॉ. ग्रँट यांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या डॉ. हिरेमठ यांचे निधन ही रुबी हॉल क्लिनिक आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी असल्याचेही डॉ. ग्रँट यांनी नमूद केले. त्यांच्या वैद्यकीय योगदानासह रुग्णांशी जपलेले माणुसकीचे नाते कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. हिरेमठ यांच्या निधनाने पुण्यातील हृदयरोग उपचार क्षेत्रातील एक अनुभवी, कुशल आणि समर्पित वैद्यकीय तज्ज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


