(मुंबई)
मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे मध्य रेल्वेने 29 मेपासून पुढील दहा दिवस काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गाड्या दादर आणि ठाणे स्थानकांवरच थांबवण्यात येणार असून प्रवाशांना पुढील प्रवास लोकलने करावा लागणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर पायाभूत सुविधा व अन्य महत्त्वाची कामे सुरू असल्याने 29 मेपासून पुढील दहा दिवस काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या CSMT पर्यंत धावणार नाहीत. या गाड्या दादर आणि ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना लोकल सेवेचा वापर करून CSMT पर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
- 22120 मडगाव – CSMT तेजस एक्सप्रेस
- 12112 अमरावती – CSMT एक्सप्रेस
- 11002 बल्लारशाह – CSMT नंदीग्राम एक्सप्रेस
- 12810 हावडा – CSMT एक्सप्रेस
- 11020 भुवनेश्वर – CSMT कोणार्क एक्सप्रेस
- 22144 बिदर – CSMT एक्सप्रेस
- 22108 लातूर – CSMT एक्सप्रेस
ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी
- 12134 मंगळुरू – CSMT एक्सप्रेस
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासासाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या पुन्हा नियमितपणे CSMT पर्यंत धावतील. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

