(सातारा / वृत्तसंस्था)
कॅन्सरमुळे आपला मृत्यू होणार असल्याची भीती मनात बाळगून, आपण गेल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाचे हाल होतील, या समजुतीतून जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा खटला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. अखेर न्यायालयाने आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विजय आनंदराव खताळ (वय 35, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना 23 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. आरोपी विजय खताळ याला कॅन्सर झाल्यामुळे आपला मृत्यू होणार असल्याची समजूत झाली होती. आपण मृत्युमुखी पडल्यानंतर मुलगा विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (वय 12) याची काळजी कोण घेणार आणि त्याचे हाल होतील, अशी भीती त्याच्या मनात होती. याच विचारातून त्याने स्वतःच्या पोटच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाचा मृतदेह स्वतःच्याच उसाच्या शेतात टाकला. या घटनेप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी केला. त्यांनी प्रकरणाचा छडा लावत आरोपी पित्याला अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती लकडे यांनी बाजू मांडली.
खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. याशिवाय परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील निवाडे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने विजय खताळ याला दोषी ठरवले.
भारतीय न्याय संहिता कलम 302 अंतर्गत आरोपीला जन्मठेप आणि 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तर कलम 201 अंतर्गत ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.


