(पुणे / वृत्तसंस्था)
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या म्यूनिशंस इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीतील कथित लाचखोरीचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणले आहे. कंपनीच्या पुणे कार्यालयातील कार्यकारी संचालकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पुण्यासह मैसूरू, बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये एकूण २ कोटी २३ लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कंत्राटाशी संबंधित लाचखोरीच्या आरोपांमुळे संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, म्यूनिशंस इंडिया लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार आणि दारूगोळा निर्मिती करणाऱ्या एसएमपीएफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कांसल यांच्यासह तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सरकारी कंत्राटे मिळवून देण्यासाठी खासगी ठेकेदार आणि विक्रेत्यांना बेकायदेशीर फायदा करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे.
या प्रकरणी सीबीआयने १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तपासाचा भाग म्हणून पुणे, मैसूरू, बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत पुण्यातील मुख्य आरोपी अनिल कुमार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात झडती घेण्यात आली.
या झडतीदरम्यान पुण्यातून १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर मैसूरू, बंगळुरू आणि नवी दिल्ली येथील छाप्यांमध्ये आणखी ५० लाख रुपये रोख मिळाले. याशिवाय, तपासासाठी महत्त्वाची ठरू शकणारी कागदपत्रेही सीबीआयच्या हाती लागली आहेत.
सरकारी पदाचा कथित गैरवापर करून खासगी कंपन्यांना कंत्राटे मिळवून देणे आणि त्याबदल्यात आर्थिक मोबदला स्वीकारणे, या आरोपांच्या अनुषंगाने सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची पडताळणी केली जात आहे.


