( पुणे )
पुण्यातील चंदन नगर परिसरात रुममेटकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पायल किशोर राजगुरू असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिच्या तीन रुममेट तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पायलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास चंदन नगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
पोलिसांना तपासादरम्यान पायलच्या कपड्यांमध्ये सुसाईड नोट सापडली. या पत्रात तिने आपल्या रुममेट्सकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. पायलने लिहिले आहे की, तिच्या मैत्रिणी अनेक दिवसांपासून तिला सतत मानसिक त्रास देत होता. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. एवढेच नव्हे तर तिच्या आई-वडिलांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तिने या पत्रात केला आहे. या सततच्या धमक्या आणि मानसिक तणावामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने नमूद केले आहे.
तीन रुममेट्सविरुद्ध गुन्हा
पायलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तिच्या तीन रुममेट्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सबुरी संतोष काळे (वय २५), शिवानी शाम आजबले (वय २६) आणि दिपाली (रा. अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी, विठ्ठलनगर) अशी आरोपी तरुणींची नावे आहेत. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
फ्लॅटमध्ये राहत होती पायल
पायल किशोर राजगुरू (वय १९) ही पुणे येथे नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती विठ्ठलनगर परिसरातील महावीर सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये इतर तीन तरुणींसोबत भाड्याने राहत होती. तिच्या रुममेटपैकी सबुरी काळे आणि शिवानी आजबले या दोघी नोकरी करत असल्याची माहिती आहे.
मोबाईल चोरीच्या संशयातून वाद
काही दिवसांपूर्वी फ्लॅटमधून पैसे, पर्स आणि एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. चौकशीदरम्यान मोबाईल घेतल्याची कबुली पायलने दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इतर रुममेट्सना यापूर्वीही पैसे पायलने घेतले असावेत असा संशय आला होता. या कारणावरून त्या तिला वारंवार जाब विचारत होत्या आणि हा प्रकार महाविद्यालयात तसेच तिच्या आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. या गोष्टी बाहेर समजल्यास बदनामी होईल, अशी भीती पायलला वाटत होती.
सकाळी घडली घटना
९ मार्च रोजी सकाळी सुमारे ७:३० ते ९:१५ या वेळेत ही घटना घडली. त्या वेळी एक रुममेट जिमला गेली होती, एक झोपलेली होती आणि तिसरी नोकरीसाठी बाहेर गेली होती. याच दरम्यान पायलने सुसाईड नोट लिहून खोलीतील पंख्याला दोरी लावून गळफास घेतला.
सकाळी सुमारे ९:१५ वाजता जिमहून परतलेल्या तरुणीने हा प्रकार पाहताच पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पायलला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

