(राजापूर / वार्ताहर)
नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार प्रमोद जठार यांनी भाटकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली. तसेच बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय माहिराचा शोध आणि कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला.
या दुर्घटनेत उशिरा मोहम्मद (वय ६), जुहेरिया (वय ९) आणि बुशिरा (वय ११) या तीन मुलांचे मृतदेह हाती लागले. डोळ्यांसमोर मुलांवर ओढवलेले संकट आणि त्यानंतर तीन मुलांचे मृतदेह हाती येण्याच्या घटनेमुळे जुनेद भाटकर आणि त्यांच्या पत्नी हिना भाटकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगात आमदार प्रमोद जठार यांनी भाटकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी त्यांनी बेपत्ता माहिराच्या शोधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. माहिराचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाची मदत मिळावी, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच भाटकर कुटुंबीयांना तातडीने आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या.
तीन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, बेपत्ता माहिराचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी कुटुंबीयांना दिला.


