(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी डेरवण येथे विविध वयोगटांतील अॅथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा ओझर नं. १ मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
१४ वर्षांखालील वयोगटातील ट्रायथलोन ‘बी’ प्रकारात शाळेतील कु. दुर्वा मंगेश गुरव, कु. श्रुती नरेश पळसमकर, कु. पल्लवी पांडुरंग मालपेकर आणि कुमार सार्थक जयेंद्र मालपेकर यांनी सहभाग घेतला. या प्रकारात ६० मीटर धावणे, लांब उडी आणि बॉल थ्रो या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
या स्पर्धेत दुर्वा मंगेश गुरव हिने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला, तर श्रुती नरेश पळसमकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दुर्वा गुरव हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे ओझर नं. १ शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक नवी उंची मिळाली आहे.
यापूर्वीही रग्बी जिल्हा असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये व्ही फिटनेस सेंटरचे प्रशिक्षक युवराज मोरे, गावचे सरपंच विकास रेगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी गुरव, मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, शिक्षक शैलेंद्र बंदसोडे, शिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय गायकवाड तसेच ग्रामस्थ आणि पालकांचे मोलाचे योगदान लाभले.
दुर्वा गुरव हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड आणि विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

