(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा निर्णय झाल्यास राजापूर तालुक्यात शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्ष महायुती म्हणून निवडणुका लढवतील. मात्र महायुतीचा निर्णय झाला नाही, तर शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढविण्यास पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांनी दिली.
मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर नागले यांनी राजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकांसाठीची एकूण व्यूहरचना, पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.
अलीकडेच झालेली नगर परिषद निवडणूक शिवसेना, भाजपा व मित्रपक्षांनी महायुती म्हणून लढवली होती. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून तसा आदेश मिळाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही महायुतीतूनच लढविल्या जातील, असे नागले यांनी स्पष्ट केले. मात्र महायुती झाली नाही, तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार देऊन निवडणूक लढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद भक्कम असून, त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, असे नागले यांनी सांगितले.
प्रत्येक गण व गटातून तीन ते चार इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. विशेषतः वडदहसोळ गट व गणात इच्छुकांची संख्या लक्षणीय असून, पुरुषांसह महिला उमेदवारही मोठ्या संख्येने निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. ही परिस्थिती पक्षाची संघटना मजबूत असल्याचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार किरण सामंत जे उमेदवार देतील, त्यांना निवडून आणण्याचा निर्धार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असल्याचेही नागले यांनी स्पष्ट केले.
राजापूर नगर परिषद निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना नागले यांनी नियोजनाच्या अभावामुळे काही चुका झाल्याची कबुली दिली. उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब आणि नियोजनातील त्रुटींमुळे नगराध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र या चुका भविष्यात सुधारून आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करून सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य असून, पंचायत समितीत सत्ता स्थापन करताना जिल्हा परिषदेतही राजापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल, असा दावा दीपक नागले यांनी यावेळी केला.

