(रत्नागिरी / वार्ताहर)
नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) महाराष्ट्र निर्देशालयाच्या वतीने आयोजित दहा दिवसांच्या ‘प्री-मेन्यू’ (महाराष्ट्र नवल युनिट) प्रशिक्षण शिबिराचा रत्नागिरीत यशस्वी समारोप झाला. आगामी ‘मेन्यू २७’ ओपन सी सेलिंग या सागरी नौकावहन मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित या शिबिरात राज्यातील १२० कॅडेट्सनी सहभाग घेत प्रगत सागरी कौशल्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे १२० कॅडेट्सपैकी ६० जणांची मुख्य सागरी मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण शिबिरात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार एनसीसी ग्रुप मुख्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅडेट्सचा समावेश होता. यामध्ये १०४ नवल विंग, १४ आर्मी विंग आणि २ एअरफोर्स विंगच्या कॅडेट्सनी सहभाग नोंदवला. त्यामुळे या शिबिरातून तिन्ही सैन्य दलांमधील समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन घडले.
शिबिरादरम्यान कॅडेट्सना २७ फूट लांबीच्या ‘डीके व्हेलर’ बोटींच्या माध्यमातून समुद्रात नौकानयन आणि रोईंगचे प्रशिक्षण देण्यात आले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्यासाठी संकटकालीन जीवनरक्षणाची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. याशिवाय कॅडेट्समधील धैर्य, आत्मविश्वास आणि साहसी वृत्ती विकसित करण्यासाठी रॅपलिंग तसेच समुद्रातील पॅरासेलिंगसारख्या आव्हानात्मक क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला.
प्रशिक्षणात निवड झालेल्या ६० कॅडेट्सची मुख्य ‘मेन्यू २७’ सागरी नौकावहन मोहिमेत निवड करण्यात आली आहे. या मोहिमेत रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा असा एकूण २५० किलोमीटरचा सागरी प्रवास २७ फूट लांबीच्या डीके व्हेलर बोटींच्या साहाय्याने पूर्ण केला जाणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी कॅडेट्स रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर २२ ऑक्टोबरला भगवती जेट्टी येथून मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. त्यानंतर जयगड, तवसाळ, बोऱ्या बंदर आणि पालशेत जेट्टी असा प्रवास करत ३१ ऑक्टोबर रोजी भगवती जेट्टी येथे मोहिमेचा सांगता समारंभ होणार आहे.
या मोहिमेचा उद्देश केवळ सागरी नौकावहनापुरता मर्यादित नसून, ‘कोकण ज्ञान तरंग’ या संकल्पनेतून किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये सामाजिक प्रबोधन घडवून आणण्याचाही आहे. ‘ज्ञान आणि प्रगतीची धरून कास, आदर्श कोकणाचा करूया विकास’ या ब्रीदवाक्यानुसार २५० किलोमीटरच्या सागरी प्रवासादरम्यान विविध बंदरांवर कॅडेट्स पथनाट्ये सादर करणार आहेत. प्रत्येक बालकासाठी सक्तीचे शिक्षण तसेच महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण या विषयांवर किनारपट्टी भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कॅडेट्सना स्थानिक मत्स्यालय आणि खाडीतील खारफुटी परिसंस्थेला शैक्षणिक भेट घडवून आणण्यात आली. या भेटीद्वारे त्यांना सागरी जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाची माहिती देण्यात आली. यासाठी एनसीसी महाराष्ट्र निर्देशालयाच्या वतीने शिरगाव येथील फिशरीज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज आणि आसामंत फाउंडेशन यांचे आभार मानण्यात आले.
खडतर प्रशिक्षणातून सागरी कौशल्ये आत्मसात केलेले आणि उच्च मनोबलाने सज्ज झालेले एनसीसीचे हे कॅडेट्स आता ‘मेन्यू २७’ मोहिमेच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवर सागरी साहसासोबतच शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.


