(रत्नागिरी)
शहरालगतच्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणात अटक होऊन नुकताच जामिनावर सुटलेल्या संशयिताने फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. अरगान उर्फ अरमान करीम खान (२४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.
१३ मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी खेडशी येथे लॉजवर छापा टाकून देह व्यापाराचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत चार महिलांना ताब्यात घेतले गेले होते, तसेच अरमान खानवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. तो गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात होता व काही दिवसांपूर्वी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटला होता. जामिनावर सुटल्यानंतर घरी परतलेल्या अरमानने आपल्या प्रेयसीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या काळात तिचे लग्न ठरल्याचे समजल्याने तिने अरमानशी नातेसंबंध तोडल्याचे समजते. या घटनेने मानसिक तणावाखाली गेलेल्या अरमानने गुरुवारी दुपारी आपल्या मित्राला घरी बोलावून भावनिक संवाद साधला. त्यानंतर तो बाथरूममध्ये जाऊन फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
फिनेल प्राशन केल्यानंतर उलट्या होऊ लागल्यानंतर त्याचा मित्र धावून गेला आणि ही माहिती तातडीने नातेवाईकांना दिली. अरमान उपचारास नकार देत होता, मात्र नातेवाईकांच्या समजुतीनंतर त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे वेश्या व्यवसायासारख्या गंभीर प्रकरणात अडकलेला अरमान, दुसरीकडे प्रेमभंगाचा मानसिक धक्का या दुहेरी आघातांमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.