(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणात सुमारे ७६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य सुशील शिवलकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता राहुल बर्वे, अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे आणि तज्ज्ञ मार्गदर्शक प्रवीण मोने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी आणि विस्तार अधिकारी (प्राथमिक) नरेंद्र गावंड यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन देणे, त्यांचे प्रशासकीय व शैक्षणिक ज्ञान अद्ययावत करणे आणि अध्यापन क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार त्यांना सक्षम बनविणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी शिक्षण विभागातील तज्ज्ञ अधिकारी आणि मार्गदर्शक विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत आहेत.
या प्रशिक्षणाच्या समन्वयक म्हणून अश्विनी काणे आणि दिपाली जंगम काम पाहत आहेत. प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे परिषद दालन, प्रशिक्षणार्थींच्या निवासाची व्यवस्था तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. आधुनिक शैक्षणिक वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने सहभागी प्रशिक्षणार्थींना आपल्या ज्ञानात आणि कौशल्यांत भर घालता येणार आहे.


