(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील राजे ग्रुपच्या वतीने बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजे ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेली भव्य दिव्य शोभा रॅली विशेष लक्षवेधी ठरली.
या शिवजयंती उत्सवात राजे ग्रुपने सकाळ सत्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मालगुंड -गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राजे ग्रुपचे अध्यक्ष दत्ताराम उर्फ बावा आग्रे, उपाध्यक्ष संजय दुर्गवळी, कार्याध्यक्ष निलेश भातडे, खजिनदार नितीन भातडे आदी पदाधिकारी तसेच मालगुंड गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल निलेश गुरव, मालगुंडचे पोलीसपाटील अमोल राऊत, पत्रकार संदीप खानविलकर, वैभव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात राजे ग्रुपच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,फनी गेम्स स्पर्धा, सत्कार समारंभ, व्याख्यान, रॅली, रेकॉर्ड डान्स स्पर्धा असे विविधांगी कार्यक्रम पार पाडण्यात आले. याच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजे ग्रुपने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ला ते मालगुंड जोशीवाडी येथील शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकापर्यंत ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत भव्य दिव्य शिवज्योत दौड काढली. ही शिवज्योत दौड देखील शिवजयंती उत्सवाचे खास आकर्षण ठरले.हा संपूर्ण उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी राजे ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.