(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यात सध्या लग्न जुळवून देण्याच्या आमिषातून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून, भोसे (बावची) येथे उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका महिलेने स्वतःचे पहिले लग्न आणि पोटच्या मुलीची माहिती लपवून एका निष्पाप तरुणाशी विवाह केल्याचा आरोप समोर आला असून, लग्नाच्या नावाखाली तब्बल १ लाख ५३ हजारांची रोकड आणि दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण लाटून टोळीने पलायन केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथे अशाच प्रकारे एका तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा ‘लुटेरी दुल्हन’ टोळी सक्रिय झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महिला अश्विनी मारुती धानोळे (रा. देवरुख, ता. संगमेश्वर) हिला पुढे करून पिंटू ऊर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर आणि युवराज कांबळे (सर्व रा. रेडी, ता. मंगळवेढा) यांनी संपूर्ण कट रचल्याचा आरोप आहे. या एजंटांनी मध्यस्थी करत फिर्यादी तरुणाच्या भोसे येथील राहत्या घरी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता शुभमुहूर्तावर विवाह लावून दिला. अक्षता पडल्या, मंगलाष्टके झाली; मात्र हा विवाह नव्या संसाराचा प्रारंभ नसून, आर्थिक लुटीचा डाव असल्याचे काही दिवसांतच उघड झाले.
लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी वर पक्षाकडून १ लाख ५३ हजार रुपये रोख तसेच दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण घेतले. विवाहानंतर नववधूचे आधीच एक लग्न झाले असून तिला एक मुलगी असल्याची माहिती समोर आली. ही बाब जाणीवपूर्वक लपवून पैशांसाठी हा बनाव रचल्याचे उघड होताच, फसवणूक झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी संतप्त होत तातडीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार आरोपी शिवाजी कोळेकर आणि युवराज कांबळे यांचा पोलिस युद्धपातळीवर शोध घेत असून, या टोळीने राज्यातील आणखी किती तरुणांना विवाहाच्या आमिषाने गंडा घातला आहे, याचाही तपास सुरू आहे. या प्रकारामुळे विवाह जुळवताना केवळ ओळखीवर किंवा एजंटांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

