(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अवैध मद्यव्यवसाय, गावठी हातभट्ट्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, गेल्या तीन दिवसांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १४ कारवाया करून दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसून आले आहे. या विशेष मोहिमेदरम्यान लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई राजापूर तालुक्यातील कोदवली बसस्टॉप फाट्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप आणि इनोव्हा कारमधून बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत वाहने आणि मद्यासह सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूविरोधातही पोलिसांनी व्यापक मोहीम राबवली. रत्नागिरी शहरातील भाटीमिऱ्या परिसरात नारळबागेच्या आडोशाने दारू साठवून ठेवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली. खेडमध्ये घराच्या आडून अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली, तर रेल्वे स्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे पडक्या घरात लपवून ठेवलेली गावठी दारू जप्त करण्यात आली. जयगड, देवरुख आणि संगमेश्वर परिसरातील जंगलमय भागांमध्ये छापे टाकून मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली येथे घरालगतच्या शेडमध्ये सुरू असलेला अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणत संबंधितावर कारवाई करण्यात आली. दापोली तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठेत झोपडीच्या आडोशाला सुरू असलेल्या दारूविक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकून आरोपीला जेरबंद करण्यात आले. अलोरे-शिरगाव आणि दाभोळ परिसरात आंबा व सुपारीच्या बागांमध्ये लपवून ठेवलेली गावठी दारू जप्त करण्यात आली. मंडणगड आणि सावर्डे येथेही देशी व गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. खेडशी रेल्वे पुलाजवळ विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली. साखरतर पुलाजवळ विदेशी मद्यप्राशन करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या विशेष मोहिमेत एकूण १४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून बोलेरो पिकअप, इनोव्हा कार, गोवा बनावटीची दारू, देशी मद्य तसेच मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. अवैध मद्यव्यवसाय आणि दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी अवलंबलेली ही आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरत असून, भविष्यातही अशाच स्वरूपाच्या कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

