(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा बाळगणारे आणि त्यांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू ठेवली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर तालुक्यात एका संशयितास घातक शस्त्रांसह रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईत बंदूक, गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव संजय श्रीधर फनगुसकर (रा. बेलदूर, ता. गुहागर) असे आहे.
जिल्ह्यातील अवैध शस्त्रवापर आणि त्यांची बेकायदा हालचाल रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्च रोजी विशेष पथक गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, गुहागर–श्रृंगारतळी मार्गावर मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करत असलेला एक इसम पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडून एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा घातक साठा हस्तगत करण्यात आला. प्राथमिक चौकशीत शस्त्रांच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ नोंदविण्यात आला असून आर्म्स ऍक्ट १९५९ च्या कलम ३ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जप्त करण्यात आलेली शस्त्रे आरोपीने कोठून मिळवली, त्यांचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जाणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

