(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि प्रशासकीय कामकाजात अचूकता आणण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थिती नोंदणीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी ऑनलाइन हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ‘स्मार्ट हजेरी’ प्रणालीचा वापर केला जाणार असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांना प्रथम ‘स्विफ्टचॅट’ हे मोबाईल ॲप डाउनलोड करून आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर ॲपमधील ‘स्मार्ट हजेरी बॉट’च्या माध्यमातून शाळेचा ११ अंकी यूडायस संकेतांक आणि शिक्षकांचा शालार्थ ओळख क्रमांक किंवा राष्ट्रीय शिक्षक संकेतांक नोंदवून उपस्थितीची नोंद करता येणार आहे. या प्रणालीमध्ये शिक्षक उपस्थित, गैरहजर, अर्ध्या दिवसाची रजा, पूर्ण दिवसाची रजा तसेच प्रशिक्षणासाठी उपस्थित असल्याच्या नोंदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करणे आणि तिचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे.
शिक्षकांच्या उपस्थितीपुरती ही व्यवस्था मर्यादित नसून विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्याची सुविधाही प्रणालीमध्ये देण्यात आली आहे. वर्गशिक्षकांना ‘विद्यार्थी हजेरी’ हा पर्याय निवडून संबंधित वर्ग आणि तुकडीतील गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करता येणार आहे. त्याचबरोबर हजेरीचा अहवालही तयार करता येईल. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एकाच डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शाळांच्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन हजेरी नोंदविण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सुरू असलेल्या शाळांसाठी तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चालणाऱ्या शाळांसाठी संबंधित वेळापत्रकानुसार उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. शालार्थ प्रणालीवर शिक्षकांची माहिती उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये शालार्थ ओळख क्रमांकाचा वापर केला जाईल. अन्य शाळांमध्ये यूडायस प्लस प्रणालीवरील राष्ट्रीय शिक्षक संकेतांकाच्या आधी ‘NT’ हा उपसर्ग लावून नोंदणी करण्याची तरतूद आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांकडून नियमित आढावा
ऑनलाइन हजेरीची नोंद नियमितपणे केली जाते की नाही, यावर शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील हजेरी नोंदणीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद डिजिटल पद्धतीने उपलब्ध झाल्यामुळे प्रशासकीय देखरेख अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या नव्या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि शाळास्तरावर आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यभरातील शाळांमध्ये ही प्रणाली किती प्रभावीपणे कार्यान्वित होते, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


