(मुंबई)
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्य संकटग्रस्त असताना, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ट्रस्टकडून तातडीने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामाजिक उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने यापूर्वीही राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळीही ट्रस्टचा हा निर्णय पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टकडून 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टकडून 1 कोटी, तर तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

