(नवी मुंबई)
राज्यात मुसळधार पावसाने जोर धरताच धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, नवी मुंबईतील खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंदी आदेश असतानाही धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेले. दोघांचाही शोध अद्याप सुरू असून, शोधमोहीमेदरम्यान एका तरुणाच्या शरीराचा अवयव (पाय) आढळल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांत दोन दुर्घटना
3 आणि 4 जुलै रोजी पांडवकडा धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाहून नेले. पहिली घटना शुक्रवारी, तर दुसरी शनिवारी घडली. बेपत्ता झालेल्यांपैकी तळोजा फेज-1, सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ येथे राहणारा महमद मुवाशीर (वय 20) आणि सांताक्रूझ येथील सोहन किणी यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शोधादरम्यान शरीराचा अवयव सापडला
रविवारी (5 जुलै) सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान परिसरातील एका खड्ड्यात एका तरुणाच्या शरीराचा अवयव (पाय) आढळून आला. बचाव पथकाने तो ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. डीएनए तपासणीनंतर त्याची अधिकृत ओळख निश्चित होणार आहे. मुसळधार पाऊस, पाण्याचा प्रचंड वेग आणि डोंगराळ परिसरामुळे बचावकार्याला मोठा अडथळा येत असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
मित्रांसोबत गेलेला तरुण प्रवाहात वाहून गेला
प्राथमिक माहितीनुसार, महमद मुवाशीर हा मित्रांसोबत पांडवकडा धबधब्यावर गेला होता. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, खराब हवामान आणि अंधारामुळे पहिल्या दिवशी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. शनिवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. धबधबा परिसर, नाले आणि दगडांच्या कपारीत शोध सुरू असला तरी अद्याप दोन्ही तरुणांचा शोध लागलेला नाही.
बंदी आदेशाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
पावसाळ्यातील वाढत्या धोक्यामुळे खारघर पोलिसांनी यापूर्वीच पांडवकडा धबधबा आणि परिसरातील तलावांमध्ये प्रवेशबंदी लागू केली आहे. धोकादायक ठिकाणी जनजागृतीचे फलकही लावण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही अनेक पर्यटक बंदी आदेशाकडे दुर्लक्ष करून धबधब्यावर जात असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
खारघर परिसरातील डोंगररांगांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारे धबधबे आणि नैसर्गिक जलसाठे दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, या ठिकाणी पाण्याची खोली, अचानक वाढणारा प्रवाह आणि निसरडे खडक यांचा योग्य अंदाज न आल्याने वारंवार दुर्घटना घडतात. याशिवाय प्रशासनाने लागू केलेल्या बंदी आदेशांकडे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात धबधबे, ओढे आणि तलावांसारख्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी नागरिकांना पावसाळ्यात धबधबे, ओढे, तलाव आणि नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह काही क्षणांत वाढू शकतो आणि त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

