(चिपळूण / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी उघड झाली असून, चिपळूण पश्चिमचे ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे राजीनामापत्र सुपूर्द केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे. घाग यांच्या राजीनाम्यावर जिल्हाध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
पक्ष संघटनेत काम करताना आपल्या पदाची आणि जबाबदारीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना गेल्या काही काळापासून निर्माण झाल्याचे उदय घाग यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे. संघटनात्मक कामासाठी प्रामाणिकपणे वेळ देत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. मात्र, काही निर्णयप्रक्रिया आणि संघटनात्मक बाबींमध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मतांना पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याने मनात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या हितासाठी अनेकदा परिस्थितीशी जुळवून घेत काम केले. तथापि, सध्याच्या परिस्थितीत तालुकाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे योग्य वाटत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण पश्चिम तालुकाध्यक्षपदाचा स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे घाग यांनी पत्रात म्हटले आहे.
आपला निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नसून, पक्ष संघटनेतील सध्याच्या परिस्थितीबद्दलची नाराजी आणि मनातील खंत व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपने आजपर्यंत आपल्यावर दाखविलेला विश्वास तसेच वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल घाग यांनी आभार मानले आहेत. आपला राजीनामा स्वीकारून तालुकाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे केली आहे.
उदय घाग हे चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील दहिवली गावचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाप्रमुख पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मनसेमध्ये त्यांनी तब्बल १७ वर्षे काम केले. या काळात त्यांनी चिपळूणचे उपतालुकाध्यक्षपदही भूषवले. त्यानंतर दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकीय कार्यासोबतच उदय घाग यांचा सावर्डे परिसरातील सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्येही सहभाग राहिला आहे. त्यांनी यापूर्वी दोन वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद सांभाळले होते.


