(पुणे / वृत्तसंस्था)
हुंड्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप करत ३३ वर्षीय आयटी अभियंता तृष्णा राहुल सकपाळ यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेचे वडील बाळकृष्ण निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती राहुल सकपाळ याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २९ सप्टेंबर रोजी तृष्णा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत पती (राहुल संजय सकपाळ), सासू (वैशाली संजय सकपाळ), सासरे (संजय मनोहर सकपाळ), नणंद (शैली संजय सकपाळ) आणि आजेसासू (शकुंतला साळुंके) यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करत तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत, असे नमूद केले आहे.
बाळकृष्ण निकम यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तृष्णा यांचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांच्यावर संपूर्ण पगार सासरच्या मंडळींकडे देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तसेच माहेरचा फ्लॅट सासूच्या नावावर करण्यासह सासऱ्यांसाठी एक कोटी रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी करण्याची मागणी केली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नात तृष्णा यांच्या माहेरच्यांनी 13 तोळे सोन्याचे दागिने दिले होते.
वारंवार होणाऱ्या मारहाण व छळामुळे दोघे पती-पत्नी 2021 मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले. मात्र, तिथेही पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी निघून आली होती. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित शारीरिक छळाला कंटाळून तृष्णा सन नोव्हेंबर २०२१ मध्ये माहेरी परतल्या होत्या. त्यानंतर राहुल याने दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.
तृष्णा यांच्या आत्महत्येनंतर चार दिवसानी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी पती राहुल, सासू वैशाली, सासरे संजय, नणंद शैली आणि आजी-सासू शकुंतला साळुंखे (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरल्याचे नमूद आहे. या चिठ्ठीच्या पार्श्वभूमीवर आणि वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैष्णवी हगवणे, स्वाती पाठक आणि वैष्णवी गिसरे या विवाहितांच्या आत्महत्येची चर्चा सुरू असताना हे नवीन प्रकरण उघडकीस आल्यामुळे पुण्यात चाललंय तरी काय, असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडला आहे.


