(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कथित अनागोंदी कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, रुग्णालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च २०२६ मध्ये रुग्णालयाच्या कारभाराचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशांचीही अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कथित निष्क्रियतेमुळे रुग्णालयातील व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा मनसेने केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सिटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात रुग्णांनाच स्वच्छता करण्यास सांगितले जात असल्याचा, तसेच रुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतागृहात कंडोमचा खच आढळल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांसाठी रेफर केंद्र बनल्याचा आरोप करत, शासनाकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी आणि मोठ्या कंपन्यांकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा सीएसआर निधी नेमका कुठे खर्च केला जातो, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
रुग्णालयातील कारभाराबाबत मनसेने यापूर्वीही वेळोवेळी आवाज उठवला असल्याचे जाधव यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत रुग्णालय प्रशासनाला निधीच्या वापराबाबत जाब विचारण्यात येणार असून, रुग्णालयाच्या कारभाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, ही मनसेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


