(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीमुळे राजकीय समीकरणांना वेगळी कलाटणी मिळाली आहे. यामध्ये पाच थेट सरपंच पदांचा समावेश असून, कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनल चंद्रकांत शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदांसाठीही बिनविरोध निवडींचा प्रभाव दिसून आला आहे. आतापर्यंत नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यामुळे काही ठिकाणी निवडणूक न होता थेट प्रतिनिधित्व निश्चित झाले आहे. दरम्यान, उर्वरित १२ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असून, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. चार ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर दोन ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी चार उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पूनम मोहिते (असुर्डे), ओंकार गेल्ये (शिवणे), संजय सुतार (आंबव पोक्षे), पल्लवी चाळके (तांबेडी), नरेश गोसावी, राजेंद्र ब्रीद, गणेश साळवी (पाटगाव), अंकिता गवंडी तसेच दीपाली दिलीप गीते (माभळे) यांचा समावेश आहे. दरम्यान, साखरपा, कोंडगाव, तुरळ आणि राजीवली या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी थेट लढत होणार असून, या ठिकाणी स्थानिक राजकारणाचे समीकरण निर्णायक ठरणार आहे. बिनविरोध निवडींचा कल आणि उर्वरित जागांसाठीची चुरस यामुळे संगमेश्वर तालुक्यातील ही पोटनिवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.

