(दापोली / वार्ताहर)
मुंबईला जाण्यासाठी घरातून निघालेला २७ वर्षीय तरुण दापोली तालुक्यातील मुरुड भैरीचा कोंड येथील तलावात मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसाद अनंत बांद्रे (वय २७, रा. मुरुड, भैरीचा कोंड, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद बांद्रे हा मुंबईला जाण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजल्यापासून घरातून निघून गेला होता. मात्र, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी मुरुड भैरीचा कोंड येथील तलावात तो बुडून मृत झालेल्या अवस्थेत तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी दखल घेतली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. प्रसादचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबतची अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


