(दापोली)
श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय, गावतळे येथे दि. १ ते ८ ऑक्टोबरदरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मूल्यवर्धन शिक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात आयोजित करण्यात आले होते.
प्राचार्या सौ. भक्ती सावंत यांच्या नेटक्या नियोजनात हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. समारोप प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, “मानवमूर्ती घडवणे सोपे नसते. कितीही अंधार झाला तरी आपण काळजी करणार नाही; मेणबत्तीच्या प्रकाशातसुद्धा आशेचा किरण शोधत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे हेच खरे शिक्षकधर्म आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “प्रशिक्षणामुळे माणूस सक्षम बनतो. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असेल, तर कृतीतून वर्तनातून मूल्य रुजविणे अत्यावश्यक आहे. बदलत्या काळानुसार पहिल्यांदा संस्कार देणे गरजेचे आहे, त्यासाठी विविध प्रशिक्षणांची आवश्यकता आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाग विस्तार अधिकारी बळीराम राठोड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “सतत आनंदी राहायचे असेल, तर स्वतःच्या पेशाशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे.”
या प्रशिक्षण शिबिरात सचिन दांगडे, अमृत सुर्यवंशी आणि अभिजीत बनकर यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण प्रशिक्षण उत्साह, सहभाग आणि सकारात्मकतेच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.

