(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घराची साफसफाई करीत असताना अचानक अंगणात कोसळलेल्या ४७ वर्षीय महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चरवेली-नागलेवाडी येथे घडली. सोनल विजय नागले (वय ४७, रा. चरवेली, नागलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनल नागले या ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घराची साफसफाई करीत होत्या. याचदरम्यान त्या अचानक अंगणात कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ९५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. सोनल नागले यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.


