(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मनोहर सिताराम गुरव (रा. वनगुळे, गुरववाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दुसरा दुचाकीस्वार प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) हा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लांजा पोलिसांनी करंबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गुरव हे रविवारी सायंकाळी आपल्या मेस्ट्रो दुचाकीने (एमएच ०८ एसी १८८९) मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळे गावाच्या दिशेने जात होते. ते कुवे पुरागाव हद्दीत आले असताना, मागून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या डिओ दुचाकीने (एमएच ०८ एएम ९२२७) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. दुसरी दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की, मनोहर गुरव हे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. महामार्गावरील या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मनोहर गुरव यांचे जावई सुहास सखाराम भोवड (वय ३४, सध्या रा. वनगुळे, मूळ रा. डोंबिवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डिओ दुचाकीचालक प्रथमेश करंबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या अपघातात करंबळे हादेखील जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


